बारामती – दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही अशा शब्दात भावनिक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘एक्स’ वर केली आहे.
आज विद्या प्रतिष्ठान इथे सुनेत्रा पवार या दादांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक झाल्या. यावेळी मनात साठलेल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
आठ महिने झाले… तरी प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक सर्वसामान्यांच्या मुखी आजही एकच जिव्हाळ्याचा शब्द आहे ‘दादा’.. ! त्या एका शब्दात त्यांचे तुमच्यावरचे प्रेम, विश्वास आणि नाते सामावलेले आहे. आज त्यांच्याच भावना मनात घेऊन तुमच्यासमोर उभी आहे अशा भावनाही व्यक्त केल्या.
तुमची सहचारिणी म्हणून तुमच्यानंतर ही जबाबदारी स्वीकारताना माझ्या मनात एकच ध्यास आहे, तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण करणे आणि तुम्ही जपलेला माणुसकीचा वारसा पुढे नेणे. तुम्ही दिलेली शिकवण आणि जनतेशी जोडलेले हे नाते मी आयुष्यभर मनापासून जपत राहीन असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दादांच्या स्मृतीस्थळी दिला.
