नागोठणे (महेश पवार) : इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून तसेच गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होईल या भीतीने भारत पेट्रोलियम कंपनीच्या रायगड गॅस एजन्सीच्या नागोठण्यातील कोळीवाडा परिसरलगत असलेल्या बुकिंग ऑफिस समोर गेल्या तीन चार दिवसांपासून गॅस सिलेंडर घेण्यासाठी महिला व पुरुषांची भली मोठी रांग लागत असून गॅस सिलेंडर घेणाऱ्यांची गर्दी उसळली आहे. मात्र गॅस सिलेंडरचा साठा मुबलक स्वरूपात उपलब्ध होत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन रायगड गॅस एजन्सी या गॅस वितरक एजन्सीकडून करण्यात आले आहे.

मार्च २०२६ मधील सध्याच्या जागतिक परिस्थितीनुसार, इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष अत्यंत तीव्र झाला असून हे एक प्रमुख युद्ध क्षेत्र बनले आहे. या युद्धाचा परिणाम म्हणून आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे, ज्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असले तरी सध्या गॅस कंपन्यांकडून हॉटेल, रेस्टॉरंट अशा वाणिज्य वापरासाठी असलेले सिलेंडरचे वितरण करणे बंद केले आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा पुरवठा ग्राहकांना मुबलक स्वरूपात व्हावा यासाठी सर्वच गॅस कंपन्या प्रयत्नशील आहेत.

असे असतांनाच नागोठण्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. त्यामुळे येथील गॅस एजन्सीच्या ऑफिस बाहेर सकाळी आठ वाजल्यापासून गॅस बुकिंग करण्यासाठी मोठी रांग लागत आहे. एरव्ही घरपोच सिलेंडर मिळत असल्याने निश्चिंत असलेले घरातील पुरुष, महिला सकाळीच गॅस एजन्सीच्या ऑफिस बाहेर उभे राहत आहेत. चार – पाच तास, तसेच उन्हाची पर्वा न करता, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसलेल्या या ठिकाणी महिला – पुरुष उभे राहत असल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गर्दीत जर कुणाला उष्माघाताचा त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न गॅस ग्राहकांतून उपस्थित केला जात आहे.

तसेच एरव्ही २१ दिवसानंतर गॅस भरण्याची मुदत वाढवून ती सर्व गॅस कंपन्यांनी २५ दिवसांची केल्यामुळे आणि ऑनलाइन प्रक्रियेत ओटीपी मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने ही गर्दी नियंत्रणात आणण्यास गॅस ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना मुश्किल होत आहे. तसेच गॅस बुकिंग ऑफिस बाहेर गर्दी होत असल्याने होम डिलिव्हरी साठी जाणाऱ्या गाड्यांवरील कर्मचारीही येथेच थांबविण्यात आल्याने या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.

गॅस सिलेंडरसाठी होणाऱ्या या गर्दीमुळे काळाबाजार करणाऱ्यांचे फावले असून काहीजण घरगुती सिलेंडर चढ्या भावाने विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गॅस वितरक कंपनीने लवकरात लवकर या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दुपारी ३ वाजता बंद करण्यात येणारे बुकिंग ऑफिस गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही दिवस का होईना दुपारी ३ नंतर सुरू ठेवावे आणि गॅस सिलेंडर होम डिलिव्हरी करणाऱ्या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आणि ग्राहकांना होणारा त्रास टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.