दापोली : दापोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या रिक्त पदावर अखेर स्थिर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून श्री. दत्तात्रय नामदास यांनी सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी दापोली कार्यालयाचा पदभार स्वीकारला. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजावर ताण निर्माण झाला होता. आता नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांसह वकील, दस्तलेखक व बॉण्ड विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यापूर्वीचे सह दुय्यम निबंधक श्री. दत्तात्रय शिंदे यांची पदोन्नती झाल्यानंतर कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकारी म्हणून श्री. वायगणकर व श्री. रानभरे यांनी सांभाळला. मात्र, दापोली तालुक्यातील वाढत्या दस्त नोंदणीच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक मानली जात होती.
श्री. दत्तात्रय नामदास यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन २०२४ मध्ये पुणे येथील मुख्य आयजीआर (नोंदणी व मुद्रांक विभाग) कार्यालयात सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची सह दुय्यम निबंधक, पुणे-११ येथे नियुक्ती करण्यात आली. तेथे काही काळ प्रभारी अधिकारी म्हणून यशस्वीपणे कामकाज सांभाळल्यानंतर त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची दखल घेत त्यांची दापोली येथे बदली करण्यात आली आहे.
सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील दस्तलेखक, बॉण्ड विक्रेते, वकील, पक्षकार तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे दापोली सह दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दापोलीत सह दुय्यम निबंधक म्हणून दत्तात्रय नामदास यांची नियुक्ती..
