लांजा (प्रतिनिधी) : हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, लांजा-रत्नागिरी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल जावडे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे (निवासी शाळा), ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूल जावडेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिरीषा साठे (प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, पुणे), डॉ. जया सागडे (निवृत्त उपप्राचार्य, आयएलएस लॉ कॉलेज, पुणे), श्रीमती प्रसन्ना इनवली (समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या), हेरीटेज संस्थेच्या अध्यक्ष व लांजा पंचायत समितीच्या माजी सभापती ॲड. अपर्णा पवार तसेच संस्थापक संतोष कांबळे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आश्रमशाळेच्या ‘हेरीटेज प्रयोगवार्ता’ या न्यूजलेटरचे प्रकाशन करण्यात आले. सदर न्यूजलेटरमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ दरम्यान शाळेत राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, कला व क्रीडा उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

समारंभात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पदक व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.