नागपूर : सुजात आंबेडकर यांनी २३ मार्च रोजी होणाऱ्या आरएसएसविरोधी विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील मोर्चा स्थळाची पाहणी केली. आरएसएस मुख्यालयासमोरील परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी आवश्यक तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि कार्यकर्त्यांच्या सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
या वेळी वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता, शिस्तबद्ध नियोजन आणि संघटित उपस्थिती यावर सुजात आंबेडकर यांनी विशेष भर दिला.
मोर्चा शांततेत आणि संविधानिक मार्गाने पार पाडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
२३ मार्च रोजी नागपूर येथे होणाऱ्या या मोर्चाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून, विविध सामाजिक घटकांकडून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
