रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : विकासाच्या दृष्टीने रोहा-अष्टमी नगरपालिकेला अपेक्षेपेक्षा अधिक विकासनिधी मिळालेला आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘नमो उद्यान’ कामाचे भूमिपूजन जिल्ह्यात सर्वप्रथमच रोह्यात होत आहे. तर (क) वर्ग असलेल्या रोहा न.पा. हद्दीत पहिले क्लॉक टॉवर उभा राहत असल्याने ही अभिमानास्पद बाब आहे.
तर दुसरीकडे माझ्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या श्रीवर्धन शहराला आकर्षक समुद्रकिनारा लाभल्याने नेहमी हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. या नगरपालिकेला दुसरे भरीव उत्पन्नाचे साधन नसून, राज्य शासनाच्या ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अभियानांतर्गत स्पर्धेत श्रीवर्धन न.पा.ने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला, नंतर कोकणात अव्वल स्थान मिळविले आहे. आता राज्यात प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
या कामी नक्कीच यश मिळणार असून, देशातील पहिले पेशवे स्मारक श्रीवर्धन शहरात विकसित करण्याचा मानस असल्याचे सांगत, पर्यटन क्षेत्रात श्रीवर्धन नगरपालिका तर विकासाच्या बाबतीत रोहा-अष्टमी नगरपालिका अव्वलस्थानी असणार, असा आत्मविश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
रोहा-अष्टमी न.पा.तर्फे रविवारी (ता. २२) रोजी सायंकाळी फिरोज टॉकीज ते धावीर मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे लोकार्पण, बायपास रोड येथे क्लॉक टॉवर कामाचे भूमिपूजन तसेच राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘नमो उद्यान’ विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे जाहीर सभेप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे, उपाध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, निता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के, नगरसेवक अजीत मोरे, अरबाज मणेर, पूर्वा मोहिते, फरहा पानसरे, अलमास मुमेरे, स्नेह अंब्रे, प्रियंका धनावडे, दिवेश जैन, माज सवाल, शहराध्यक्ष अमित उकडे, माजी अध्यक्ष सुभाष राजे इत्यादी नगरसेवक व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना ना. अदिती तटकरे म्हणाल्या की, नगराध्यक्षांच्या मागणीनुसार उद्यानाच्या दर्शनी भागात स्टॉलसाठी ३५ ते ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून देणार, तसेच मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवल्यास शहरातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे नक्कीच प्रयत्न करणार, असा दावा देखील त्यांनी केला.
खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने श्री धावीर मंदिर रोडसाठी ४० लाखांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम रमजान ईदपूर्वी करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली होती. अनिकेत भैया तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर काम मार्गी लागल्याने लोकांची दुवा मिळाली.
उद्यानाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या तिजोरीत १० लाखांच्या घरात भर पडते. ‘नमो उद्यान’ अंतर्गत अधिक विकास झाल्यास भरीव उत्पन्न मिळेल. १ कोटी २६ लाख रुपये खर्च करून १८ मीटर उंचीचा क्लॉक टॉवर उभा राहत असल्याने शहराच्या वैभवात आणखी भर पडणार, असे प्रास्ताविक मनोगत नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी व्यक्त केले.
