लांजा : नगरपंचायतीचा सुधारित विकास आराखडा (Development Plan-DP) अखेर शुक्रवारी प्रसिध्द करण्यात आला असून विविध गट क्रमांक, सर्वे नंबर आणि शहरातील प्रमुख रस्ते, निवासी-व्यावसायिक झोन तसेच सार्वजनिक आरक्षणांमध्ये व्यापक बदल करण्यात आले आहेत.
सुधारित आराखड्यात शहरातील अनेक प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण, काही रस्त्यांचे पुनर्मार्गीकरण तर काही रस्ते कायम ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ९ मीटर, १२ मीटर आणि १८ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आधी प्रस्तावित असलेले रस्ते वगळून विद्यमान रस्तेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या विस्तार भागात रिंगरोड (वळण रस्ता) प्रस्तावित ठेवण्यात आला असून त्याच्या आसपासच्या जमिनींच्या वापरातही बदल करण्यात आले आहेत.
आराखड्यात अनेक सर्वे नंबर मधील जमिनींचे शेती, निवासी, व्यावसायिक व मिश्र वापर अशा विभागांमध्ये पुनर्वर्गीकरण करण्यात आले आहे. काही क्षेत्रे शेती विभागातून काढून निवासी विकासासाठी खुली करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी वाढत्या नागरीकरणाचा विचार करून निवासी क्षेत्राचा विस्तार दाखवण्यात आला आहे. नवीन रस्ते आणि नागरी सुविधांच्या अनुषंगाने लागून असलेल्या जमिनींचे झोन बदलण्यात आले आहेत.
सुधारित विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडांमध्येही बदल करण्यात आले आहेत. काही आरक्षणे स्थानांतरित करण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी नवीन आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या गरजेनुसार नगरपंचायत प्रयोजन, सार्वजनिक सुविधा, उद्याने व इतर आरक्षित जागा नव्याने निश्चित करण्यात आल्या आहेत. ईव्ही चार्जिंग स्टेशन, सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा आणि इतर नागरी सुविधा लक्षात घेऊन काही भूखंडांचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे.
या सुधारित आराखड्यामुळे लांजा शहराचा नियोजनबद्ध विस्तार, वाहतूक सुलभता, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन विकास साधण्यास मदत होणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रस्ते जाळे सुधारल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच नवीन निवासी व व्यावसायिक प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.
नगरपंचायतीने जाहीर केलेला सुधारित विकास आराखडा कार्यालयात तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, संबंधित जमिनीधारक व नागरिकांनी आपापल्या सर्वे नंबरनुसार माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
सुधारित विकास आराखड्यामुळे लांजा शहराच्या आगामी विकासाला दिशा मिळणार असून, नियोजनबद्ध पायाभूत सुविधा व सार्वजनिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांच्या तक्रारी, हरकती, सूचना आणि मागणींची दखल घेऊन या आराखड्यामध्ये जास्तीतजास्त सुधारणा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरुवातीला या आराखड्याला झालेला तीव्र विरोध आता मावळला असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.