खेड (लोटे) प्रतिनिधी : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, लोटे (खेड) येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी “मीरा देशपांडे” स्कॉलरशिप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे तसेच गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत असून त्यांना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी बळ मिळत आहे.
महाविद्यालयाच्या प्रगतीचा गौरव करण्यासाठी ‘अमेनोरा येस फाउंडेशनतर्फे” विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षात लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना कै. मीरा देशपांडे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
कै. मीरा देशपांडे या अमेनोरा समूहाचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्या मातोश्री असून त्या स्वतःही नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या होतकरू विद्यार्थिनींना या प्रसंगी आर्थिक मदतही प्रदान करण्यात येणार आहे. या सहाय्यामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळेल आणि त्या या संधीचा योग्य लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.