खेड : ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे आणि डी. डब्ल्यू.एस.कंपनी यांनी पुन्हा एकदा मोलाचा पुढाकार घेतला आहे. ‘उर्मी’ प्रकल्पांतर्गत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल (कोरेगाव, बोरज व तुंबाड) आणि आर. जी. काते विद्यामंदिर (धामणी) येथे मासिक पाळी व वैयक्तिक आरोग्य जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थिनींना वर्षभर पुरेल अशा सॅनिटरी नॅपकिन किटचे वाटप करण्यात आले.
* शास्त्रीय माहिती आणि संवाद : यावेळी सेवा सहयोगच्या स्वयंसेवक प्रांजली इनामदार आणि ‘उर्मी’ प्रकल्प समन्वयक दीप्ती बोगम यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.
- स्वच्छतेचे महत्त्व: मासिक पाळीदरम्यान पाळावयाची स्वच्छता, संसर्ग टाळण्याचे उपाय आणि या काळातील पोषक आहार यावर प्रांजली इनामदार यांनी संवाद साधला.
- जागरूकता: मासिक पाळी हा नैसर्गिक बदल असून त्याभोवती असणारे सामाजिक गैरसमज बाजूला सारून मुलींनी आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन दीप्ती बोगम यांनी केले.
- ‘उर्मी’ प्रकल्पाचे ध्येय : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये, या उद्देशाने सेवा सहयोग आणि DWS डी.डब्ल्यू.एस. कंपनी सातत्याने कार्य करत आहेत. मुलींच्या आत्मविश्वासासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी खेडचे स्थानिक रहिवासी सुयोग बेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सेवा सहयोग फाउंडेशनने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापनाने कृतज्ञता व्यक्त केली असून दयाळ गट जि. प. सदस्य श्री. अण्णा कदम ह्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
