खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात खाडीपट्ट्यातील महिलांनी आज संतप्त मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. आरोग्य सेवेशी संबंधित गंभीर तक्रारींमुळे महिलांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झालेली असतानाही त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही, तसेच शासकीय निवासस्थानही रिकामे केलेले नाही. याशिवाय ड्युटीवर असताना ग्रामीण भागातील रुग्णांकडून अनधिकृत पैशांची मागणी केली जात असल्याचे, रुग्णांशी उद्धट वर्तन केले जात असल्याचे तसेच कर्तव्यात अनियमितता असल्याचे गंभीर आरोप महिलांनी केले.
या सर्व प्रकारांमुळे स्थानिक महिलांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आज काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, मोर्चाच्या वेळी संबंधित डॉक्टर अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांचा रोष अधिकच वाढला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या. बदली झालेल्या डॉक्टरांनी तात्काळ कार्यभार सोडून नवीन ठिकाणी रुजू व्हावे, शासकीय क्वार्टर रिकामे करावे, तसेच नव्याने नियुक्त झालेल्या डॉक्टरांनी तात्काळ सेवेत हजर व्हावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, तसेच रुग्णांकडून अनधिकृतरित्या घेतलेल्या पैशांची लाचलुचपत विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
तसेच, या प्रकरणाबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्याकडे औपचारिक तक्रार करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनकर्त्या अंकिता शिगवण आणि सौ. पालकर यांनी प्रशासनाला इशारा देत, तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे आणि समीक्षा म्हादे यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.
दरम्यान, या घटनेमुळे कोरेगाव परिसरात संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने त्वरित लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.