दापोली :रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, दापोली स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. महसूल व वन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
जिल्हा मुख्यालय रत्नागिरीपासून दापोली, खेड व मंडणगड हे तालुके दूर असल्याने महसूल विभागाशी संबंधित जिल्हास्तरीय कामांसाठी नागरिकांना रत्नागिरी येथे जावे लागत होते. नागरिकांची सोय आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने दापोली येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दापोली, खेड आणि मंडणगड हे तीन तालुके राहणार आहेत. तर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर हे सहा तालुके राहतील.
अपर जिल्हाधिकारी, दापोली यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची पदस्थापना शासनस्तरावरून करण्यात येणार असून, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी उपलब्ध मनुष्यबळातून करतील. नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरती जागा निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर कायमस्वरूपी जागा शोधून कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत शासनस्तरावरून सूचना देण्यात येणार आहेत.