नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ एप्रिल २०२६ रोजी, रात्री उशिरा दाखल झालेल्या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७८(१)(ii) आणि ३५६(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तक्रारदार निखिल रामचंद्र इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रामेश्वर दरेकर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर १,१४७ एकर जमीन असल्याचा दावा केला.

हा व्हिडिओ ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. या दाव्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन बावनकुळे कुटुंबाची बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अधिकृत कागदपत्रांतून उघड झालेले सत्य

तहसीलदार, कामठी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण जमीन सुमारे २८.४४ एकर आहे. ही जमीन विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये नोंदलेली आहे. १,१४७ एकरचा दावा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.