मुंबई : भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सोमनाथ मंदिराच्या गौरवशाली परंपरेचा जागर करणारा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम आज उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून रेल्वेमार्गे उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
“सोमनाथ मंदिर हे केवळ आस्थेचे केंद्र नसून राष्ट्रीय स्वाभिमान, सांस्कृतिक अस्मिता आणि भारतीय सभ्यतेच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. इतिहासातील अनेक आक्रमणे आणि संकटांचा सामना करून पुनर्निर्माणाच्या माध्यमातून पुन्हा उभे राहिलेले सोमनाथ मंदिर भारतीय समाजाच्या अखंड श्रद्धा आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते.
या विशेष यात्रेत सहभागी नागरिकांना सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासह मंदिराचा वैभवशाली इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भारतीय परंपरेतील महत्त्व यांची माहिती देण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्रे आणि भारतीय मूल्यव्यवस्थेवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.