रायगड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालिये. नागोठणे परिसरातून वाहणाऱ्या आंबा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने नदीकाठच्या भागांना पुराचा फटका बसलाये . नागोठणे येथील कोळीवाडा परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच नागोठणे बाजारपेठेतही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने व्यापारी आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.