रोहा : अष्टमी नगरपरिषद व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक सभागृहात HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महिलांना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे,डॉ.पूजा भट,डॉ.अपूर्वा क्षीरसागर,डॉ.फरीद चिमावकर, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गटनेते महेंद्र गुजर,सभापती, महेश कोलाटकर,महेंद्र दिवेकर, नीता हजारे,उप सभापती गौरी बारटक्के,नगरसेविका स्नेहा अंबरे,प्रियांका धनावडे,फराहा पानसरे, पूर्वा मोहिते, संजना शिंदे,अफरीन रोगे,डॉ. अवनी शेडगे,प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.पूजा भट यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे दुसरे मोठे कारण म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे. HPV लस पूर्णपणे सुरक्षित असून ९ ते २६ वयोगटात घेतल्यास सुमारे ९० टक्के संरक्षण मिळते. लसीबाबत पसरलेल्या अफवा व गैरसमजांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपले मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा ना. आदिती तटकरे यांच्या कार्याचा गौरव करत महिलांच्या आरोग्याबाबत त्या सदैव तत्पर असल्याचे नमूद केले.त्यांच्या प्रेरणेतूनच ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोहिमेसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
या मोहिमेत डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून विविध भाषांमध्ये जनजागृती करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरणासाठी पुढाकार घेतला.
