कणकवली : “ससा तो ससा… त्याने कासवाशी पैज लावली” या प्रसिद्ध गोष्टीची आठवण करून देणारी अनोखी पैज कणकवलीत रंगली आणि या पैजेची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे. व्याजी पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आव्हानातून तब्बल ८ लाख रुपयांची पैज लागली. कणकवलीतील चार जणांनी रात्रीच्या वेळी कणकवली ते कुडाळ असा पायी प्रवास करून ही पैज जिंकली.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली शहरातील चार जणांनी एका व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून घेतलेली रक्कम परत करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, एवढी मोठी रक्कम तत्काळ देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर या चौघांच्या क्षमतेवरून शाब्दिक वाद निर्माण झाला. त्यातूनच “तुम्ही एवढेही करू शकत नाही” अशा आव्हानातून थेट पैजेची बोली लागली.
पैजेची अटही तितकीच भन्नाट होती. कणकवलीहून कुडाळमधील आरएसएन हॉटेलच्या चौकापर्यंत चालत जायचे, मध्ये कुठेही थांबायचे नाही, बसायचे नाही आणि वाहनाचा वापर करायचा नाही, अशा अटी निश्चित करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, ही पैज जिंकल्यास तब्बल ८ लाख रुपयांची रक्कम माफ करण्याचे ठरले.
“कुडाळपर्यंत काय, गरज पडली तर सावंतवाडी आणि गोव्यापर्यंतही चालत जाऊ,” असा आत्मविश्वास पैज स्वीकारणाऱ्या चौघांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
पैजेतील नियम आणि अटींचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख करणारे पथकही नेमण्यात आले. अखेर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास या अनोख्या पायी प्रवासाला सुरुवात झाली.
रात्रीच्या अंधारात कणकवलीपासून कुडाळच्या दिशेने चौघांची पावले पडू लागली. सुरुवातीला हा प्रवास सहज वाटत असला तरी रात्र वाढत गेली तसे आव्हानही वाढत गेले. मात्र, पैज जिंकण्याचा निर्धार केलेल्या चौघांनी चालण्याचा वेग कायम ठेवला.
ओरोसपर्यंत मजल मारल्यानंतर मात्र पैज लावणाऱ्या मंडळींची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. या दरम्यान पैजेतील एका व्यक्तीला नियम मोडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा रंगली. मात्र, चौघांनी एकी कायम ठेवत पैज पूर्ण करण्याचा निर्धार सोडला नाही.
अखेर पहाटे साडेतीनच्या सुमारास चौघांनी कुडाळमधील आरएसएन हॉटेलचा चौक गाठला आणि पैजेची अट पूर्ण केली. मंजूर अटींनुसार तब्बल ८ लाख रुपयांची रक्कम माफ झाली, अशी माहिती आहे.