खेड (प्रतिनिधी) : – खेड–खोपी (वेरळ ते खोपी विभाग) मार्गाच्या अत्यंत खराब अवस्थेबाबत ग्रामस्थांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, खेड यांच्या वतीने रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
या मार्गावरील मोठमोठे खड्डे, खराब झालेले डांबरीकरण यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. वेरळ, हेदली, ऐनवरे, खोपी, कुळवंडी तसेच परिसरातील इतर गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत या समस्येविरोधात आवाज उठवला होता. समाजमाध्यमांवरही या प्रश्नाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाने याची दखल घेत काम सुरू केले.
रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले तसेच या कामाची गुणवत्ता टिकवून ठेवत केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकालीन दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग सुस्थितीत राहणे अत्यंत गरजेचे असल्याने प्रशासनाने काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.