खेड : – तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथील शफी अब्दुल्ला वरवटकर (५५) यांचा पूर्ववैमनस्यातून खून करत पसार झालेल्या कादिर शमशुद्दीन घारे, गणी ईस्माईल बोट, अशरफ महामूद बोट (तिघेही रा. मेटे-मोहल्ला) यांच्या येथील पोलिसांनी अखेर १५ दिवसांनी मुसक्या आवळल्या. गुरुवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा ही अटकेची कारवाई केली.
यातील मृत शफी वरवटकर याची ‘बायपास’ शस्त्रक्रिया झाली होती. याबाबतची माहिती असताना देखील तिघांनीही जुन्या भांडणाच्या रागातून ६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हातासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शेखअली हसन वरवटकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खूनप्रकरणानंतर तीनही मारेकरी पसार झाले होते. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांच्या शोधार्थ पथकेही रवाना झाली होती. मात्र, तिघांचा सुगावाच लागला नव्हता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे व पथकाने तीनही पसार मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळत खूनाचा छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी केली.