पोलादपूर : तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते पक्षप्रवेश केल्यानंतर केवळ 48 तासात घरवापसी केली आहे.

पोलादपूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाने 20 वर्षांची महाविकास आघाडीची साथ सोडून या पोलादपूर पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली. यामुळे शेकापक्षाच्या माटवण पंचायत समिती गणाच्या नामाप्र महिला उमेदवार साक्षी शैलेश कांबळेकर विजयी झाल्या. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीला पोलादपूर तालुक्यातील सर्व जागांवर व्हाईटवॉश मिळाला. भाजप उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या रकमा देऊनही ते कार्यकर्ते भाजप राष्ट्रवादी युतीसाठी मतं मागू शकले नाहीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या शेकाप मधील साखर पेरणीचेही मतदानात रुपांतर होऊ शकले नाही.

शेकापक्षाचे महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या सडवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चोळईतील निवासस्थानी तालुका चिटणीस बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शेकापचे सवाद सप्तक्रोशीतील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात असल्याचे ठामपणे सांगितले.