मुंबई – महाराष्ट्राच्या हास्यरेषा या प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनाही हसू आवरले नाही. मला आशिष शेलार यांनी सांगितलं की मी बोलवलं की मुख्यमंत्री कार्यक्रमाला येतात. यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईल जाईन, ते येत जातील. पण २०२९ सालापर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, असा मिश्किल टोला त्यांनी मंत्री आशिष शेलार यांना लगावला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय व्यासपीठ अशी सुरुवात केली. यासाठी त्यांनी व्यासपीठावर कोण कोण आहेत हे तुम्हाला नक्की माहिती असल्याचं म्हटलं. राज ठाकरे म्हणाले की आशिष शेलार यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना बोलवलं की मुख्यमंत्री येतात. याच्यापुढं बोलवत जाईन आणि ते येत जातील असं त्यांचं म्हणनं आहे. २०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, अजून काही सांगू मी म्हणत राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांना मिश्किल टोला मारला. यानंतर उपस्थितांना हसू आवरता आलं नाही. राज ठाकरे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे मला लाडाने टिनू म्हणायचे. 1979 साली माझं पहिलं व्यंगचित्रं आलं होतं. त्याचं शिर्षक आमच्या टिनूनं चितारलेलं उद्याचं चित्र हे होतं. उत्तम चित्र काढणं, उत्तम ऑईल पेंटिंग करणं याचा उत्कृष्ठ हात उद्धव ठाकरे यांचा होता. वेडं वाकडं काय करायचं ते आमच्याकडे होतं. व्यंगचित्र आवडती गोष्ट होती, तीन वर्ष जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये घालवल्यानंतर सोडून दिलं.
त्यामुळं मी पदवीधर नाही मात्र पदवीधरच्या निवडणुकीत उभा राहू शकतो. कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला पदवीधर लागतो, असं काही नाहीये. या देशाची लोकशाही आहे ना यासाठीच आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले की प्रमोद नवलकर यांनी पूर्वी पदवीधर मतदारसंघाचा फॉर्म दाखवला होता. त्या फॉर्मवर खाली लिहिलं होतं, उमेदवारीची सही अथवा अंगठा, म्हणजे मेरा भारत महान, अजून काही होऊ शकत नाही. तो फॉर्म हेच एक व्यंगचित्र होतं, असं राज ठाकरेंनी म्हटलं. मंत्री आशिष शेलार यांनी भाषण करताना म्हटलं की उद्धवजी तुम्ही समजून घ्या, राज ठाकरे बोलल्यावर मुख्यमंत्री येतात. राज ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवत राहा, आणि उद्धवजी आणि मला बोलवत राहा, असं आशिष शेलार म्हणाले होते. महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तकात गेल्या शंभर वर्षातील मराठीतील प्रख्यात व्यंगचित्रकारांचा परिचय आणि त्यांची निवडक व्यंगचित्रं असलेल्या भारतीय भाषांतील ग्रंथाचं प्रकाशन ग्रंथाली प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.
