हर्णे : पुन्हा एकदा परप्रांतीय फास्टर नौका हर्णे किनाऱ्याजवळ येऊन मासेमारी करू लागल्याने स्थानिक मच्छीमार हैराण झाला आहे. शासनाने या फास्टर नौकांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर हर्णे बंदरातील मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागेल अशी व्यथा हर्णे येथील मच्छीमार अनंत चोगले यांनी व्यक्त केली आहे
दापोली तालुक्यातील मच्छीमारांनी अनेक वेळा परप्रांतीय फास्टर नौकांविरोधात आवाज उठविला आहे. त्या त्या
वेळी तात्पुरती कारवाई करण्यात आली असली तरी कायम स्वरुपी ठोस कारवाई झाली नसल्यामुळे पुन्हा पुन्हा या फास्टर नौका किनाऱ्याजवळ मासळी पकडून वेगाने खोल समुद्रात जातात. त्यांच्या वेगापुढे स्थानिक नौका टिकाव धरू शकत नसल्याने आता शासनाने याच धर्तीवर फास्टर नौका या नौकांवर कारवाईसाठी उपलब्ध करून या नौका कायमस्वरूपी जप्त कराव्यात अशी मागणी येथील मच्छीमार करत आहेत. अनेकवेळा फास्टर नौका विरोधात उशीरा कारवाई झाल्यानंतर या नौका तोपर्यंत खोल समुद्रात गेलेल्या असतात. अशा वेळी स्थानिक मच्छीमार खोटा पडतो. त्यामुळे हर्णे येथील समुद्रात शासनाची कायमस्वरूपी गस्ती नौका तैनात ठेवण्याची मागणी होत आहे.