चिपळूण : २६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघात SIR प्रक्रिया महाराष्ट्रात सर्वप्रथम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या घाईवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

SIR ही काही क्रीडा स्पर्धा नाही की राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी शर्यत लावावी. प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, चिपळूण मतदारसंघात २५ हजारांहून अधिक मतदारांच्या नोंदी ‘Uncollectable’ झाल्याचे समोर येत असताना, केवळ प्रथम क्रमांक मिळवणे हा प्रशासनाच्या कामगिरीचा निकष कसा ठरू शकतो, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

“SIR मध्ये प्रथम येण्यापेक्षा एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे होते. जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण ही जबाबदारी होती; प्रथम क्रमांक मिळवून सत्कार स्वीकारण्याची स्पर्धा नव्हे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाने ‘प्रथम क्रमांक’ मिळवण्यापेक्षा प्रत्येक पात्र मतदाराची अचूक पडताळणी करून त्याचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.