खेड ( दिवाकर प्रभु ) : – शहरातील तांबे मोहोल्ला, तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी आणि धामणी या तीन ठिकाणी रविवारी दि. १५ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून सुरू असलेले अग्नितांडव खेड अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री १ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून तीनही ठिकाणच्या आगी आटोक्यात आणण्यात यश मिळवले असतानाच सोमवारी दि.१६ मार्च रोजी दुपारी ३:२५ वाजता शहरातील गुलमोहर पार्क येथील मेहमूद महाडिक मार्ग याठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेला वणवा विझविण्यातही खेड अग्निशमन दलाने यश मिळविले.
मिळालेल्या महितीनुसार., शहरातील तांबे मोहोल्ला परिसरात राहणारे रशीद तांबे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यात पावसाच्या बेगमीसाठी रचून ठेवलेल्या लाकडाच्या माचाला आग लागली. या आगीत संपूर्ण लाकडी माच आगीच्या भक्षस्थानी सापडला. या आगीने पसरत जाऊन बाजूला असलेल्या घराला घेरले आणि या आगीत संसारोपयोगी सर्व वस्तू,साहित्य जळून खाक झाले. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक भरणे येथील गणेश शिरिषकर यांनीही पाण्याच्या टँकरसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली.
तर दुसरी घटना चिंचघर प्रभुवाडी येथे घडली असून विजय शांताराम शेलार यांच्या गोठ्यात सायंकाळी करण्यात आलेल्या धुरंडीची ठिणगी उडाल्याने पेंढ्याने पेट घेऊन आग लागली. गावातील ग्रामस्थ यांनी धाव घेऊन गोठ्यातील गुरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती. की गोठ्या शेजारी घरेही या आगीच्या लाटेत सापडली असती सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणली.
तिसरी घटना मंडणगड रोडवरील धामणी येथे घडली असून गावात आलेल्या देवाच्या पालखीसाठी लावण्यात आलेल्या फटाक्याच्या माळीतील ठिणगी उडाल्याने शेजारी असलेल्या रमेश रामा कदम यांच्या गुरांच्या गोठ्यावरील पेंढ्यानी पेट घेतला. गावातील ग्रामस्थांनी तातडीने गोठ्यातील गुरांना बाहेर काढून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाचे फायरमन श्री. श्याम देवळेकर, दिपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग, सुरेश शिगवण, चालक गजानन जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीमुळे खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खेड तालुक्यात चार ठिकाणी अग्नितांडव ! मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान., सुदैवाने जिवीतहानी नाही.
