रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी २७ व २८ ऑक्टोबर रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, चिपळूण येथे दोन दिवसीय आढावा भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यालयातील प्रलंबित मोजणी कामांची आणि इतर कार्यालयीन कामकाजाची सखोल तपासणी केली. सर्वसामान्य जनतेची मोजणीची कामे जलद गतीने कशी पूर्ण करता येतील, याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, २८ ऑक्टोबर रोजी जिल्हा अधीक्षकांनी विविध विकासकामांची व मोजणी स्थळांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यामध्ये ‘स्वामित्व योजने’तंर्गत धामणवणे येथील कामांची तपासणी करण्यात आली. तसेच पेढांबे व कादवड येथील ‘हद्दकायम मोजणी’, कापसाळ येथील ‘बिनशेती (NA) मोजणी’ आणि कळंबस्ते व मजरेकाशी येथील ‘पाणंद रस्ते’ व मोजणी कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून त्यांनी मोजणीची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा अधीक्षकांच्या या दौऱ्यादरम्यान चिपळूण कार्यालयाने २८ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात १५१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली. उर्वरित कामांचा वेग वाढवून येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा आकडा २०० पार करून दाखवू, असे आश्वासन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिले आहे.
या भेटीदरम्यान श्री. सचिन इंगळी यांनी कार्यालयातील ‘भूप्रमाण केंद्रा’ची पाहणी केली. नागरीकांना उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयाचे सुशोभीकरण करणे, विविध लेखा व आस्थापना विषयक बाबींची पूर्तता करणे, तसेच प्रलंबित कामे कमी करून चिपळूण कार्यालय जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर कसे राहील, या दृष्टीने त्यांनी संपूर्ण कार्यालयाला दिशा दाखवली. जिल्हा अधीक्षकांच्या या सकारात्मक आणि बहुमूल्य मार्गदर्शनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. त्यांच्या या यशस्वी दौऱ्याबद्दल चिपळूण भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक भूमी अभिलेख, शिवप्रसाद गौरकर
शिरस्तेदार संजय पाटोळे तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
चिपळूण भूमी अभिलेख कार्यालयाला जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांची भेट; प्रलंबित मोजणी प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश…
