चिपळूण : माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आजवर मला वेळोवेळी भक्कमपणे साथ दिली. या कार्यकर्त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. कार्यकर्त्यांसोबत पुन्हा नव्या दमाने आणि उत्साहाने काम करण्यासाठी १५ जून पर्यंत आपण राजकीय भूमिका जाहीर करु आणि त्याबाबत कार्यकर्त्यांचा दणदणीत मेळावा आयोजित करू, अशी स्पष्ट भूमिका चिपळूणचे माजी आमदार श्री रमेशभाई कदम यांनी दैनिक सागरशी बोलताना मांडली.

ते पुढे म्हणाले की, काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्व आणि सर्व पदांचा मी राजीनामा दिला असला तरी राजकारणातून अजिबात निवृत्ती घेतली नाही. माझ्या विरोधात कोणी कितीही टीका करीत असेल तरी मला त्याकडे लक्ष द्यायचे नाही. कारण पक्ष वाढीसाठी मी किती खस्ता खाल्ल्या आहेत हे कार्यकर्त्यांना चांगले ठाऊक आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, पक्ष वाढीसाठी आणि जनतेची कामे करण्यासाठी मी किती योगदान दिले याचा खुलासा करण्याची मला गरज वाटत नाही., माझ्यावर टीका करणाऱ्यांना कार्यकर्ते योग्य वेळी योग्य भाषेत उत्तर देतील. याच कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जूनमध्ये मेळावा घेऊन राजकीय भूमिका जाहीर करू अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. कार्यकर्त्यांनी कुठेही जाऊ नये, आहे तिथेच थांबावे असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला.