रोहा (अल्ताफ चोरडेकर) : रोहे तालुक्यातील नागोठणेजवळील पाटणसई गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऊनाठावाडी जंगल परिसरात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर अनोळखी तरुणाचा खून करून मृतदेह जंगलात टाकण्यात आला आहे की सर्पदंश अथवा जंगलातील प्राण्यांच्या हल्ल्यासारख्या कारणांमुळे त्याचा मृत्यू झाला आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दि. २५ मे रोजी ऊनाठावाडी येथील रहिवासी काशिनाथ शिंदे हे जंगलात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलातील एका भागात त्यांना एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर रोहा व नागोठणे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मयताचे वय १८ ते २३ वर्षांदरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सदर तरुणाचा मृत्यू नेमका कधी झाला आणि तो मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात अज्ञात कारणामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.