लोटे : खेड तालुक्यातील आवाशी येथे मुंबई गोवा महामार्ग लगत असलेल्या एका भंगार गोडाऊनला आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तीन बंबानी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगी वर नियंत्रण मिळवले.
मुंबई गोवा महामार्गावर आवाशी बस थांब्या नजीक हॉटेल अन्नपूर्णा शेजारील मोकळ्या जागेत एका भंगार व्यवसायिकाचा भंगारचा प्रचंड साठा करून ठेवलेला होता. यामध्ये प्लास्टिकचे ड्रम, प्लास्टिक पिशव्या, रासायनिक कारखान्यांमध्ये वापरलेले रिकामे ड्रम, पिशव्या, लोखंड इत्यादी प्रकारचे प्रकारचे भंगार होते. मोहरम भाई नामक भंगार व्यावसायिकाचा हा भंगार साठा होता असे समजते. आग लागल्यावर आगीचे लोळ आकाशात उडू लागले. आग आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत घबराट पसरली. आग नक्की एखाद्या रासायनिक कारखान्याला तर नाही ना लागली? अशी शंका अनेकांच्या मनात आली. आगीचे वृत्त समजताच घरडा केमिकल्स चा आगीचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्याचबरोबर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब सुद्धा घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. यावेळी आवाशी मधील स्थानिक तरुण विराज आंब्रे, मंगेश मोरे, बंटी आंब्रे,एस. के. आंब्रे, जीवन आंब्रे, नाना आंब्रे, भास्कर आंब्रे, अमोल आंब्रे, भाऊ मोरे यांच्यासह शेकडो तरुणांनी अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी शर्थीची मदत केली. या सर्वांच्या सामुदायिक आणि अथक प्रयत्नानंतर सुमारे दोन तासांनी आग आटोक्यात आली. यावेळी लोटे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व शिपाई घटनास्थळावर जातीने लक्ष ठेवून होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.