मुंबई- ज्याची प्रतीक्षा होती अखेर होत आला आहे. 4 जून रोजी दुपारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. स्कायमेटने दिलेला अंदाज अगदी खरा ठरला आणि बरोबर त्याच वेळात मान्सून दाखल झाला. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार ४८ तासांत मान्सून गोवा, कर्नाटक आणि तळ कोकणात दाखल होईल तर १० जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार आहे.

यंदा त्याला ३ ते ४ दिवसांचा उशीर झाला असला, तरी मान्सूनची सुरुवातीची चाल अत्यंत समाधानकारक आणि वेगवान असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिली. पुढील २४ ते ४८ तासांत हा मान्सून गोवा, कर्नाटकचा उर्वरित भाग, रायलसीमा आणि देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. १५ जूनच्या आसपास मान्सून बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. तर दरवर्षीप्रमाणे ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण भारत दाखल होईल.

५ आणि ६ जून रोजी कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि डहाणू या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात मान्सूनचा जोर प्रचंड वाढणार आहे. अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमेक्रेचे वारे वेगवान झाल्यामुळे कोकण किनारपट्टी सराबोर होईल. ६ जूनच्या सुमारास उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील मराठवाडा परिसरात एक चक्राकार हवेची स्थिती निर्माण होत आहे. यामुळे या भागात पावसाच्या गतीमध्ये मोठी वाढ होईल. ७ जून रोजी उत्तर भारतात पाऊस काहीसा कमी होईल, मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाचा जोर आणखी वाढणार असून मान्सून वेगाने पुढे सरकेल.