दादर मुंबई : ५ जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन! या दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिका जी/उत्तर विभाग आणि रूर ग्रीन यांच्या संयुक्त विद्यमाने बाजी प्रभू उद्यान येथे टेट्रा पॅकपासून बनविलेल्या टाइल्सद्वारे पायवाट तयार करण्यात आली.

दुकाने, शॉपिंग मॉल, स्मार्ट बाजार तसेच गृहनिर्माण सोसायट्यांकडून संकलित केलेल्या टेट्रा पॅकवर वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे या टाइल्स तयार करण्यात आल्या आहेत. रूर ग्रीन लाईफ ही संस्था अनेक वर्षांपासून ‘निसर्ग वाचवा’ या भावनेने कार्यरत असून ‘वेस्ट टू इन्फ्रास्ट्रक्चर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आहे. टेट्रा पॅकपासून तयार केलेल्या अनेक घरगुती उपयोगाच्या वस्तू आजच्या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच रूर ग्रीन या संस्थेतर्फे उपस्थितांना प्लास्टिकमुक्त पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

तद्प्रसंगी जी/उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन रूर ग्रीन संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले. तसेच मनपा अधिकाऱ्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. स्थानिक नागरिकांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रूर ग्रीन संस्थेच्या या उपक्रमांची प्रशंसा केली. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पुण्यनगरी, युनायटेड वे तसेच संगम प्रतिष्ठान या संस्थांनी चैत्यभूमी समुद्रकिनारा आणि माहीम रेतीबंदर येथे विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती केली.

या सर्व कार्यक्रमांसाठी सन्मा. अमित ठाकरे आणि जी/उत्तर विभाग प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची विशेष उपस्थिती लाभली.