दापोली : दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज संध्याकाळच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येमुळे विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीतील युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात आक्रमक भूमिका घेत चटई आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिवस-रात्र कोणत्याही वेळी अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून व्यापारी, उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिक यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. अनेक भागांमध्ये दररोज काही काळ वीज नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्येची गंभीर दखल घेत युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयातच चटई टाकून झोपून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत दापोलीतील वीजपुरवठा सुरळीत होत नाही आणि वारंवार होणाऱ्या खंडिततेवर ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
