खेड (प्रतिनिधी) : – तब्बल २६ वर्षानंतर पुन्हा एकदा सन १९९९/२००० च्या एल.पी. इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यानिमित्त शाळेच्या प्रांगणात भेटण्याचा योग आला आणि जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. शालेय जीवनातील निरागस क्षण, मैत्रीचे बंध, वर्गातील गमती-जमती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन पुन्हा अनुभवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते. वर्षे सरली, काळ बदलला, पण मैत्रीचे नाते आजही तितकेच घट्ट असल्याचे या यशस्वी स्नेहमेळाव्याने सिध्द केले.
या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद श्री. काळे , श्री. लढ्ढा, श्री.भाट , श्री.गांधी आणि विद्यमान प्राचार्य श्री. भगत यांचे विशेष आभार माजी विद्यार्थ्यांनी मानले. त्यांच्या सहवासात पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचा आनंद प्रत्येकाने अनुभवला. आजच्या व्यस्त जीवनातही आपापल्या कामातून वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी या कार्यक्रमाचे खरे सौंदर्य वाढवले. हा केवळ स्नेहमेळावा नव्हता, तर मैत्री, आपुलकी आणि जुन्या नात्यांचा उत्सव होता. माजी विद्यार्थी प्रसाद पाटणे, सागर पवार, प्रसाद देवाडीगा, महेश चव्हाण, महेश खांडके, महेंद्र पवार, विजय पवार, उमेश खेडेकर, आरेश जाधव, रुपेश खेडेकर, विक्रम बर्वे, अल्पिका सावंत आणि स्मृती कोकाटे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. आजची ही सुरुवात भविष्यात आणखी भक्कम मैत्री, सामाजिक उपक्रम आणि नियमित भेटीगाठींचा पाया ठरो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येऊन “वर्षे सरली, काळ बदलला; पण मैत्रीचे नाते आजही तेवढेच घट्ट आहे.” त्यामुळे पुन्हा भेटूया… नव्या उत्साहाने, नव्या आठवणींसाठी! असे ठरवून हा स्नेहमेळावा कमालीचा यशस्वी ठरला. स्नेहमेळाव्याचे सर्वांगसुंदर सूत्रसंचलन विजय पवार तर आभारप्रदर्शन उमेश खेडेकर यांनी मानले.
वर्षे सरली, काळ बदलला,पण मैत्रीचे नाते आजही तितकेच घट्ट ! एल.पी.इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
