मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आहे असे म्हणणारे संजय राऊतच त्या गोलपिठावर बसून आहेत. तुमचे आजचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखे आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून आता तुम्ही लोकांना शहाणपण शिकवत आहात.

आपले विचार काँग्रेसला विकलेल्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अधःपतनावर भाष्य करू नये. दलाली करण्याची आणि सत्तेसाठी विचार विकण्याची सुरुवात महाराष्ट्रात 2019 मध्ये उबाठा गटाने केल्याने तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या पक्षप्रमुखांचे राजकीय अधःपतन झाले, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. बन म्हणाले की, संजय राऊत, तोडफोडीची भाषा तुम्ही करू नका. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याला सोडले जाणार नाही. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना आपली असल्याचे सांगितले होते त्यावेळीही संजय राऊत यांनी तोडफोड, मारपीट आणि धमक्यांचीच भाषा वापरली होती. आजही तुम्ही कितीही आव्हाने द्या, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कुणीही कायदा हातात घेतला, तर त्याला कायद्यानुसार चोख उत्तर दिले जाईल.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, ‘माझा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापेक्षा मी माझे दुकान बंद करेन.’ संजय राऊत वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार तुम्ही आत्मसात करणार आहात का? बाळासाहेबांचे हिंदुत्व तुम्ही स्वीकारणार आहात का? तुम्ही आज राहुल गांधी यांच्यासोबत बसता, सोनिया गांधीं यांचे लुगडे धूत आहात.