चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण-खेऺ॑ड येथील विभा अरविंद ग्रंथालय येथे नव्याने भेट मिळालेल्या पुस्तक कपाटांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक श्री. सुहास चव्हाण, श्री. प्रकाश गांगण, अध्यक्ष श्री. प्रकाश काणे, कोषाध्यक्ष श्री. विनायक ओक, कार्यवाह श्री. विजय कदम, श्री. विकास मेहेंदळे तसेच ग्रंथपाल सुप्रिया खोत उपस्थित होते.
विभा अरविंद ग्रंथालय हे कोकणातील नामवंत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. यतीन जाधव आणि साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या प्रयत्नातून पुनरुज्जीवित झालेले एक महत्त्वाचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात सध्या सहा हजारांहून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह असून सातत्याने नव्या पुस्तकांची भर पडत आहे.
ग्रंथालयाच्या पुनरुज्जीवन कार्याला हातभार म्हणून चिपळूणचे सुपुत्र व मुंबईतील सुप्रसिद्ध स्थापत्य उद्योजक प्रशांत पाटेकर यांनी पुस्तकांसाठी दोन कपाटे भेट दिली आहेत. या कपाटांमुळे ग्रंथालयातील पुस्तकांच्या योग्य व्यवस्थापनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
श्री. प्रशांत पाटेकर हे यशस्वी उद्योजक असण्यासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असून समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी कायम अधोरेखित होत असते. ते सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक, अपरान्त हॉस्पिटल चिपळूण चे संचालक तसेच आपलं चिपळूणचे उपाध्यक्ष आहेत.
विशेष म्हणजे, श्री. प्रशांत पाटेकर यांनी आपले वडील कै. प्रभाकर नारायण पाटेकर यांच्या स्मरणार्थ ही पुस्तक कपाटे ग्रंथालयाला भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.