मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पुतळे उभारण्यात आले आहेत. राज्यातील आणि देशातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्ह्यांतील महत्त्वाची ठिकाणे, रुग्णालये, शासकीय कार्यालये अशा अनेक ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.

देशात असा एकही जिल्हा नसेल, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. मात्र, नवी मुंबईसारख्या प्रगत शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. प्रशासन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा देत नाही, याकडे लक्ष वेधत रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना निवेदन देऊन नवी मुंबईत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी केली.

नवी मुंबईतील बेलापूर येथे कोकण भवनसमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने जागा द्यावी, अशी नवी मुंबईतील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांचा नवी मुंबई शहरामध्ये पुतळा उभारला पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केली. यावर नवी मुंबईमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. नवी मुंबईतील बेलापूर येथे कोकण भवनसमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारकडून जागा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याबाबत आपण जातीने लक्ष देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या मागणीकडे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.