पोलादपूर (शैलेश पालकर) : रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून ईआयएल कंपनीच्या सीएसआर निधीतून पोलादपूर तालुक्यात ३०६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. भविष्यात पोलादपूर तालुक्यात एमपीएससी, यूपीएससी तसेच दहावी-बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून तालुक्यात अनेक सरकारी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी तसेच आयपीएस व आयएएस अधिकारी घडावेत, यासाठी येत्या काही दिवसांत प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नवनिर्वाचित बिनविरोध विधान परिषद सदस्य आ. अनिकेत तटकरे यांनी दिली.
पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. अनिकेत तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा नेते श्रीयश माणिकराव जगताप, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, शहर महिला अध्यक्षा सारिका विचारे, शहराध्यक्ष अजित खेडेकर, रामदास सकपाळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांतबुवा जाधव, इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव महाडिक तसेच पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्निल भुवड, नगरसेविका श्रावणी शहा, गरुड, गणेश घाटे, आशा गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध झाल्याने दुसऱ्या कार्यकाळातील आमदारकीनंतरचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम पोलादपूर तालुक्यात होत असल्याचा अभिमान व्यक्त करत आ. अनिकेत तटकरे यांनी पोलादपूर तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्याची ऊर्जा रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक शहीद जवान, सेवानिवृत्त सैनिक आणि सरकारी कर्मचारी असलेल्या या तालुक्यातून मिळत असल्याचे सांगितले. सायकल वाटपाच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी परिश्रमाच्या बळावर आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे भविष्यात पाहण्याचा योग यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.