मुंबई : संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवेळी राऊतांनी शरद पवारांचे नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाचा पत्ता कट केला. आता आमदार सुनील प्रभूंनी पत्राचाळ घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत मांडून राऊतांना आरोपीच्या पिंज-यात उभे करत या घोटाळ्याची कबुलीच दिली आहे. आदित्य ठाकरे गटाकडून आता राऊतांचा पत्ता कट करण्याचा डाव रचला जात असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्राचाळ घोटाळ्याची तातडीने चौकशी करून कारवाई व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
राऊतांमुळे 350 मराठी कुटुंबे रस्त्यावर आली पत्रा चाळीमध्ये रहाणा-या मराठी माणसांना बेघर करण्याचे पाप संजय राऊत यांचे आहे. जवळपास साडेतीनशे कुटुंबे पत्राचाळ घोटाळ्यामुळे रस्त्यावर आली आणि याला जबाबदार राऊत आहेत. विधानसभेत पत्राचाळ घोटाळा जाहीरपणे मांडून आदित्य ठाकरे गटाकडून राऊतांची कोंडी केली जात असल्याचेही श्री. बन म्हणाले. ‘उबाठा’ मध्ये आदित्य ठाकरे वि. संजय राऊत यांच्यातील ‘सामना’ रंगला आहे अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे इराण-इसराईल युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन, गॅस टंचाईचा सामना भारत खंबीरपणे करत आहे. पुरवठा नियमित करण्याचा आटोकाट प्रयत्न हरत-हेने केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे. या युद्धकाळात देखील प्रसंगाचे गांभीर्य न समजता राऊत उठसूठ पंतप्रधानांवर बालिश टीका करत आहेत असा आरोप श्री. बन यांनी केला. खरेतर भारताची होत असलेली प्रगती पाहून राऊतांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे असा टोमणा त्यांनी मारला. देशाची काळजी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. खोट्यानाट्या बातम्या पसरवून देशात इंधन असुरक्षितता निर्माण करून अराजक निर्माण करण्याच्या राहुल गांधींच्या अजेंड्याला पुढे नेण्याचे काम राऊत करत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला.
राऊतांनी ‘उद्धव ठाकरे यांचा करुण अस्त’ असा अग्रलेख लिहावा नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले मात्र उद्धव ठाकरेंना फक्त एकदाच आणि ते सुद्धा भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री होता आले. नितीश कुमार यांचा करुण अस्त नव्हे तर राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा अस्त आणि उबाठा गटाची दारुण अवस्था असा अग्रलेख लिहायला हवा अशी कोपरखळी श्री. बन यांनी मारली. काँग्रेस बरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांचा अस्त झाला हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे, याउलट नितीश कुमार भाजपासोबत येऊन मुख्यमंत्री झाले आता राज्यसभेचे खासदार देखील होत आहेत. बिहारमध्ये जेडीयूचे सरकार भक्कम आहे, त्यांची राऊतांनी चिंता न करता आधी पायाखाली काय जळतेय ते पहावे. उद्धव ठाकरे, उबाठा गटाची अवस्था कशी दयनीय झाली आहे त्याबाबत विचार करावा, असेही श्री. बन यांनी नमूद केले.