मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन, चारा, बांबू आणि पिकासाठी सरकारी पडीक जमिनी वार्षिक केवळ एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्याने देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेचा महिला बचत गटांनी जास्तीतजास्त लाभ घेण्याचे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांनी केले.

ही योजना लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हेही उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरण हे केवळ भाषणात न ठेवता कृतीत उतरवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 19 जूनपासून लागू करण्यात आलेल्या या नवीन धोरणानुसार सरकारच्या आणि शेती महामंडळाच्या पडीक जमिनी, प्रकल्प संपादन केल्यानंतर पडून असलेल्या जमिनी, ग्रामपंचायतीच्या परवानगीने गायरान जमिनी आणि विविध शासकीय विभागांच्या पडीक जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. महिला सेवा सहकारी संस्था उमेद आणि माविमच्या अंतर्गत नोंदणीकृत झालेले महिलांचे बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, त्याबरोबरीने ग्रामसंघ आणि महिला बेरोजगारी सहकारी संस्था यांना या जमिनीसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती आ. चित्रा वाघ यांनी दिली.