मुंबई : उबाठा गटाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे उद्धवजी ठाकरे सवयीप्रमाणे याही प्रकरणात यू-टर्न घेतील. याआधीही विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी जनतेसमोर केली होती. प्रत्यक्षात सहा वर्षांची टर्म पूर्ण केली.

काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, अशी घोषणा करत त्यावरही यू-टर्न घेतला आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. आता राणा भीमदेवी थाटात राजीनाम्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे प्रत्यक्षात राजीनामा न देता यू-टर्न घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जनाब संजय राऊत, अवघ्या चार वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कुशीतून संजय राऊत आणि उबाठा गटाचा जन्म झाल्याने टेस्टट्यूब बेबी कोण आहे, हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतरच उबाठा गटाचा जन्म झाल्याने उबाठा गटाची सरोगेट मदर काँग्रेसच आहे. धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे. या शिवसेनेला साठ वर्षे पूर्ण झाली असून तिचा वर्धापन दिन एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साजरा झाला, असे सुनावत श्री. बन पुढे म्हणाले, मूळ शिवसेनेचा डीएनए हा हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. तुमचा औरंगजेब आणि अफजलखान फॅन क्लबचा डीएनए आता पाकिस्तानधार्जिणा झाला आहे. कारण तुम्ही पाकिस्तानचा उदोउदो करता. त्यामुळे आधी तुमचा डीएनए तपासा.