मुंबई : कोकणातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांची मंत्रालयात भेट घेऊन स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सुपारी पिकाचा समावेश करण्याची मागणी केली.

यावेळी कोकण विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित होते. आमदार निकम यांनी मंत्र्यांना निवेदन सादर करून कोकणातील शेतकऱ्यांसमोरील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य पुरस्कृत स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असली तरी त्यामध्ये सुपारी पिकाचा समावेश नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

सध्या बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच सुपारी लागवडीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत सुपारी पिकाचा या योजनेत समावेश झाल्यास कोकणातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार असल्याचे आमदार निकम यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागामार्फत प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार निकम यांनी दिली.

कोकणातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार शेखर निकम यांनी सुपारी उत्पादकांच्या मागणीसाठी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.