खोपोली: मागील काही दिवसांपासून लव्हेज गावातील वेताळ देवस्थान विटंबना प्रकरणाबाबत पालिका प्रशासन व पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचा लढा देण्याचा एल्गार केला आहे.

गावातील हनुमान मंदिरात पार पडलेल्या ग्रामस्थांच्या सभेत वेताळ देवस्थान विटंबना प्रकरणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतला आहे. खोपोली शहरात या संदर्भात निषेध रॅली काढण्यात येईल. त्यानंतर घटनास्थळी साखळी उपोषण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असून, जर न्याय मिळाला नाही तर याहूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इरादा ग्रामस्थांनी बैठकीत स्पष्ट केला आहे.

नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावाच्या परिसरातील स्टील कारखान्याच्या अतिरिक्त निवासी संकुलांच्या जागेत पूर्वीपासून ग्रामस्थांचे वेताळ देवस्थान आहे. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ ग्रामस्थ या देवाची पूजा करीत आहेत. कारखाना व्यवस्थापनाने या जागेवरील निवासी संकुले पाडली असून सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच जागेत वेताळ देवस्थान आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी कारखाना व्यवस्थापन, ठेकेदार व स्थानिक पोलीस यंत्रणांना या देवस्थानाबद्दल माहिती दिली होती. असे असतानाही सपाटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने एका रात्रीच सदरचे वेताळ देवस्थान जेसीबी यंत्राद्वारे अन्यत्र हलविले, त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.