मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शहर वर्षानुवर्षे घाण होत चाललं असून रस्त्यांवर कुठे डांबराचे पॅच, कुठे पेव्हर ब्लॉक तर कुठे काँक्रीटचे पॅच दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार असल्याचा उल्लेख करत, या प्रश्नावर त्यांना जाब विचारला पाहिजे, असं अमित ठाकरे म्हणाले. रस्त्यांवरील खड्डे आणि रेल्वेतील समस्या या केवळ एका विशिष्ट गटाच्या नसून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो असताना येताना रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळाली, अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकारांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना रस्त्यावर एकही खड्डा नव्हता, असा दावा करत विद्यार्थ्यांचे बहुतांश प्रश्न सहजपणे सोडवता येण्यासारखे असल्याचंही त्यांनी सांगितलं.