मुंबई : बॉम्ब टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणाऱ्या जनाब संजय राऊत यांच्या हे लक्षात येत नाही की, आता आपल्याकडे बॉम्ब नाहीत आणि सुतळी बॉम्बही उरलेले नाहीत. उरले ते केवळ फुसके लवंगी फटाके. त्यामुळे वायफळ बडबड करायची, पोकळ धमक्या द्यायच्या एवढेच तुमचे काम उरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाकिस्तानवर हल्ला करताना कुणाची परवानगी घेत नाहीत.

पाकिस्तानलाही धडा शिकवतात. जनतेनेही तुम्हाला धडा शिकवलाय. त्यामुळे आधी उरलेसुरले फुसके लवंगी फटाके सांभाळा आणि मगच इतरांना धमक्या द्या, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी एकत्र करण्याच्या नादात पडण्यापेक्षा उबाठा गट एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण उबाठा गटात भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे गटतट विभागले गेले आहेत. उबाठा गटाची चार शकले पडली आहेत, संजय राऊतांनी ती आधी सांभाळावीत आणि मग महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करावा, असे श्री. बन यांनी सुनावले.