मुंबई : काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक वादग्रस्त घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर मालाड येथील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली.

घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने मा. राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मान राखत आपल्या खास शैलीत जैन समाजाच्या प्रतिनिधींना समज दिली.

“मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे जैन आणि मराठी समाजामध्ये विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे,” अशा कडक शब्दांत राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सुनावले.