लांजा : (गोविंद चव्हाण) एकात्मतेचे प्रतीक असलेली मोहरमची ताजिया (ताबूत) मिरवणूक लांजा येथे शुक्रवार, दि. २६ जून रोजी सायंकाळी धार्मिक पद्धतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाली.

मुस्लिम बांधवांच्या पवित्र मोहरम उत्सवानिमित्त शहरातून ढोल-ताशांच्या गजरात ताजियाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे शहरातील हिंदू बांधवही सहभागी झाले होते. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवाच्या अंतिम टप्प्यातील मिरवणुकीत शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

या मिरवणुकीचा प्रारंभ शहरातील हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाहमधून दुपारी ४ वाजता झाला. बाजारपेठेतील जुना बसस्टॉप, हनुमान मंदिर, जुनी बाजारपेठ वसाहत, पौलतेश्वर मंदिर येथील तळ्याजवळून चव्हाटा मंदिर, जामा मशीद या मार्गाने पुन्हा दर्गाहमध्ये सायंकाळी ७ वाजता ताजिया मिरवणुकीची सांगता झाली. गेले दोन दिवस संततधार सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर उसंत घेतल्याने ताजिया मिरवणुकीला अधिक रंगत आली.

दरम्यान, मोहरमची मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.