चिपळूण : गेल्या सहा वर्षांपासून रोखण्यात आलेली सलून सेवांची दरवाढ, वाढत्या महागाईमुळे आता नाईलाजाने करण्यात येत आहे. मात्र, ही अल्प दरवाढ असल्याने ग्राहकांनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. संजय जाधव आणि शहराध्यक्ष पंढरीनाथ चव्हाण यांनी केले आहे.
चिपळूण शहरातील सलून व्यावसायिकांनी गेल्या सहा वर्षांपासून वाढत्या महागाईचा मोठा आर्थिक भार सहन करून सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून सलून सेवांच्या दरामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्यवसाय चालविणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने चिपळूण शहर नाभिक सलून संघटनेच्या सर्व सदस्यांच्या एकमताने १ जुलै २०२६ पासून सलून सेवांच्या दरामध्ये नाममात्र २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत सलून व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या विविध सौंदर्यप्रसाधनांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केस कापण्यासाठी व दाढीसाठी लागणारी उत्पादने, शॅम्पू, क्रीम, जेल, हेअर कलर, टॉवेल धुण्याचा खर्च, वीज बिल, दुकानांचे भाडे, कर्मचारी वेतन, तसेच व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या इतर साहित्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, भाजीपाला, अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईचा परिणाम सलून व्यावसायिकांच्या दैनंदिन जीवनावरही झाला आहे.