मुंबई : राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

NEET नंतर आता TET चा पेपर फुटला आहे. प्रत्येक परीक्षेचे पेर फुटत आहेत. वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असून सरकारच्या निष्काळजी आणि अपयशी कारभाराचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. प्रंचड पोलीस बंदोबस्त असतानाही गनिमी काव्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर पोहोचून झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर “दादा भुसे राजीनामा द्या” असे पोस्टर फडकावले व भुसे राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “पेपरचोर गद्दीछोड”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी बंगल्यासमोरील परिसरात “पेपरचोर गद्दीछोड” अशा घोषणा लिहून सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात पेपरफुटी ही नित्याची बाब झाली आहे. NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे कष्ट, वेळ आणि भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने निष्पक्ष चौौकशी करून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी.