मुंबई : भारतीय जनता पक्षाचे महायुती सरकार अत्यंत खोटारडे आहे. भाजप संसदेत खोटे बोलतो, राम मंदिराबाबत खोटे बोलतो आणि शेतकऱ्यांशीही खोटे बोलतो. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; मात्र सत्तेत येताच त्यांनी फसवी कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत हा एल्गार थांबणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
शेतकऱ्यांना विनाअट, सरसकट कर्जमाफी मिळावी या न्याय्य मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सहभाग घेतला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतमालाला भाव नाही, महागाई प्रचंड वाढली आहे. शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात आहेत; मात्र भाजप सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. लाडक्या बहिणींची जशी फसवणूक केली, तशीच फसवणूक आणि विश्वासघात भाजप सरकारने अन्नदात्याचाही केला आहे. सातबारा कोरा करण्याची वल्गना केली होती; मात्र जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून लाखो शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस आणि मित्रपक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र सरकार काही जागे होत नाही. सरकारला जाग येईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असेही सपकाळ म्हणाले.
