मुंबई : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढताना दिसले. अखेर या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत ‘सहकार पॅनल’ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

वास्तविक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. या बँकेतील सत्तेच्या चाव्या बहुजन विकास आघाडीकडून मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला. नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’च्या माध्यमातून शिंदेसेनेच्या काही उमेदवारांसह आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काही उमेदवार रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या ‘परिवर्तन पॅनल’मध्येही भाजपचे ४ आणि शिंदेसेनेचे ३ उमेदवार होते. दोन्ही पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करण्यामागे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे कारण दोन्ही नेत्यांकडून देण्यात आले होते.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात भाजपचे ८, तर शिंदेसेनेचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण २१ जागांसाठी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी ११ जागांची आवश्यकता होती. मात्र, महायुतीचे १३ उमेदवार विजयी झाल्याने शिंदे-चव्हाण यांची राजकीय चाणक्यनीती यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, या निकालामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे.