मुंबई : राजकारणात प्रत्येक टीकेला शब्दांनीच उत्तर द्यावे लागते असे नाही, कधी एक छायाचित्र आणि त्यासोबतचे मोजके शब्दही बरंच काही सांगून जातात! याचाच प्रत्यय भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून आला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी बन यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांची लायकी काढल्यानंतर बन यांनी थेट शब्दयुद्धात न उतरता आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले आहे.

‘नवनाथ बन माझा मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनिअर आहे. मी २००९ साली खासदार झालो, तेव्हा तो चड्डीत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो,’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांनी बन यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी निलेश राणे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा एका पत्रकार परिषदेतील फोटो शेअर केला.

या छायाचित्रात बन हे नारायण राणे यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. मात्र, या पोस्टमधील सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते त्याचे कॅप्शन! ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणे साहेब’ असे लिहित बन यांनी निलेश राणे यांनी वापरलेल्या ज्युनिअर या शब्दालाच आपल्या उत्तराचे माध्यम बनवले.

विशेष म्हणजे, निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन यांनी कोणतीही आक्रमक भाषा वापरली नाही, कोणताही वैयक्तिक आरोप केला नाही. उलट, टीकेतून वापरलेला एक शब्द उचलून त्याला वेगळा संदर्भ देत नारायण राणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. शब्दांचा अचूक वापर, प्रसंगावधान आणि समयसूचक विनोद यांचा संगम असलेली ही पोस्ट लक्षवेधी ठरली आहे.

राजकीय वादात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरताना दिसते. मात्र, या प्रकरणात नवनाथ बन यांनी थेट वाद वाढवण्याऐवजी एका छायाचित्रातून आपली भूमिका मांडली. निलेश राणेंच्या ज्युनिअर संबोधनाला त्यांनी दिलेले हे मिश्कील आणि बुद्धिचातुर्यपूर्ण उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.