रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख मा. प्रदीपजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनांनुसार आगामी संघटनात्मक वाटचालीचा रोडमॅप आणि विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरणे, संघटनात्मक कामकाजात निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारीतून बाजूला करून त्यांच्या जागी सक्रिय व सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे, तसेच ‘गाव तिथे शाखा’ अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सभासद नोंदणी अभियानाला गती देणे, संघटनात्मक शिस्त, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि एकजूट अधिक दृढ करणे, यावरही विशेष भर देण्यात आला.
जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी दर दोन ते तीन आठवड्यांनी प्रत्येक तालुक्याचा संपर्क दौरा करणार असल्याचे प्रदीपजी बोरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या दौऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज बनले पाहिजे. केवळ संघटनात्मक बैठका आणि पक्षविस्तारापुरते मर्यादित न राहता, सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आवाहन प्रदीपजी बोरकर यांनी केले. सध्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक मदत व सहकार्य करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर, पाणी बचत आणि जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख हे पक्षसंघटनेचा मूळ कणा आणि आत्मा आहेत, असे अधोरेखित करण्यात आले. गावागावांत पक्षाची विचारधारा पोहोचवणे, सामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे आणि तळागाळातील संघटनात्मक बांधणी मजबूत करणे यामध्ये शाखाप्रमुख व विभागप्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तळागाळातील संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्रिय करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षसंघटनेचा विस्तार, नव्या कार्यकर्त्यांना संधी, सभासद नोंदणी आणि संघटनात्मक शिस्त या माध्यमातून पक्ष अधिक व्यापक करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना स्थानिक पातळीवरील संघटनात्मक अडचणी, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्यावरही चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. गेल्या तीन-चार वर्षांचा काळ पक्षसंघटनेसाठी अत्यंत खडतर आणि संघर्षपूर्ण राहिला असतानाही, पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायकजी राऊत यांचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क, सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळे संघटनेची वाटचाल सुरू राहिली असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध प्रलोभने, आमिषे आणि दबावाच्या परिस्थितीतही जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्षाशी आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणा कायम राखल्यामुळेच संघटना एकसंध आणि टिकून राहिली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यापुढील काळातही संघटनात्मक एकजूट, शिस्त, सक्रिय सहभाग आणि सामूहिक जबाबदारीच्या बळावर पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीच्या समारोपप्रसंगीही त्यांनी संघटनात्मक बांधिलकी आणि आगामी कार्ययोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले.
या बैठकीचे आणखी एक औचित्य म्हणजे रत्नागिरी दक्षिण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांचा वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख उपस्थितीतील प्रदीपजी बोरकर आणि जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, रत्नागिरी प्रमुख मयुरेश्वर पाटील, लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, राजापूर, संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप बोरुकर व चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांचेसह महिला आघाडी उपजिल्हा संघटक रशिदा गोडद, महिला तालुका संघटक ममता जोशी, प्राची शिर्के यांचेसह जिल्ह्यातील युवा सेना व युवती सेना यांचे पदाधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख पर्यंतचे पदाधिकारी, व आजी -माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
रिक्त पदांची पूर्तता, सक्रिय कार्यकर्त्यांना जबाबदारी, गावागावांत शाखाविस्तार आणि तळागाळातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सहभाग या सूत्रांवर रत्नागिरी दक्षिण शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीची दिशा या बैठकीतून स्पष्ट झाली.
